श्री क्षेत्र गाणगापुर (गंधर्वपूर)

श्रीक्षेत्र गाणगापुराला ‘दत्त भक्तांची पंढरी’ म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते. आज श्री क्षेत्र गाणगापुरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिंह सरस्वती निवासास होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. ‘निर्गुण पादुका’च्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात.

गाणगापूर माहिती

गाणगापूर ग्रामी श्रीदत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वत: गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. गाणगापूर क्षेत्राचे महत्व वाढवावे या परिसरातील तीर्थाची शुध्दता करावी. त्याचे पावित्र्य वाढवावे. तसेच या भागातील भक्तांना मुक्ती द्यावी.
त्यांची पीडा हरण करावी हा हेतू गाणगापूर क्षेत्री वास्तव्य करण्याचा होता. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्तरुपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव देखील मिळतो. 

श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रात गाणगापूर क्षेत्र, गंधर्वपूर या विषयी माहिती

पीठिकापुरात म्हणजे पीठापूर क्षेत्रांत त्रेता युगात सवितृकाठक चयन यज्ञ (होम) भारद्वाज महर्षीनी केला होता. तेव्हा त्या यज्ञाचे भस्म हे पर्वता सारखे जमून बसले. काही काळाने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले. राम अवतारात मारूती द्रोणागीरी पर्वत घेवून जात असताना त्याचा काही भाग गंधर्व पुरात म्हणजे गाणगापूर क्षेत्रात पडला. गाणगापुरातील भस्माच्या टेकडीचा जो उल्लेख आहे त्याचा संदर्भ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात अशा प्रकारे आला आहे. भीमा अमरजा संगमाचा उल्लेख जालंदर पुराणात गंधर्वपूर असाच आहे. गंधर्वाचा वास हा हिमालय, कैलास मानस या परिसरात वर्णन केला आहे. रावणाचा भाऊ कुबेर हा कैलास मानस परिसरातच वास्तव्याला आहे पूर्वी हा गंधर्वराज दाक्षिण पंथावर श्रीलंके मध्ये होता. रावणाने त्याला पिटाळून लावले. या प्राचीन इतिहासाचा मागोवा घेतला तर काही गंधर्व राजे या तपस्थली मध्ये राहिले व त्या मुळे त्यास गंधर्वपूर असे नाव पडले असे अनुमान काढता येतो. अन्यथा गाणगापुर व गंधर्वपूर याचा संदर्भ लागत नाही. पण प्राचीन काळात भरत वर्षामध्ये गंधर्व, सिध्द, साध्य, पण इत्यादी विभूतीचा संचार होता. दत्तात्रेय यांच्या अवताराचा विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या सिध्द, साध्य, योगी याना दत्तात्रेयानी मार्ग दर्शन केले आहे. दक्षिण पथावरील कर्नाटक राज्यातील हे गंधर्व पूर गाणगापूर क्षेत्र म्हणूनच प्रसिध्द आहे. दत्त संप्रदायाचे प्रमुख असे हे तीर्थ क्षेत्र आहे.

गाणगापूरचे श्री गुरुचरित्रातले  वर्णन

श्री गुरुनृसिंह सरस्वती । अवतार असे त्रिमूर्ती
गाणगाग्रामी असे ख्याती । जे जाती तया स्थाना
तात्काळ होती मनोकामना । काही न करो हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे ||

गाणगापूर ग्रामी श्रीदत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वत: गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्तरुपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे.

वास निरंतर गाणगाभुवनासी । भक्तजन तारावयाची राहू तेथे निर्धार
आम्ही असतो याचि ग्रामी । नित्यस्नान अमरजा संगमी
वसो माध्यान्ही मठाधामी । गुप्तरुपे अवधरा ||

प्रत्यक्ष देव गाणगापूरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत. येथे देव आहेत व येथेच थांबले आहेत. कोणीही श्रद्धेने या व कृपाशिर्वाद प्राप्त करुन घ्या असा महाराजांचा संदेश आहे. याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा-अमरजा संगमावर करुन दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्तरुपाने कोणत्याही वेषात उपस्थित असतो असे महाराज सांगतात. अज्ञानामुळे शेजारी असूनसुद्धा श्री गुरुंना आपण ओळखू शकत नाही. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्र्वास ठेवला तर देव दर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे.

चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे. परंतू गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे. हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात. त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करुन घेत नाहीत. ‘नित्य जे जन गायन करिती । त्यावर माझी अतिप्रीती’ माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात हे श्रीगुरुदत्तांनी सांगितले आहे.

मठी ठेवीतो निर्गुण पादुका । पुरवीतील कामना ऐका
संदेह न धरावा मनात । ही मात आमची सत्य जाणा||

श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापूरातून निघताना आपल्या पादूका शिष्याकडे दिल्या व सांगितले या निर्गुण पादुका आहेत. परंतू निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रुपाने वास राहील. निर्गुण पादुका मठात ठेवतो. येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात कोणतीही शंका ठेवू नका आमचा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा. गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीचा भावार्थ मार्गदर्शक आहे.

 

गाणगापूर या क्षेत्राचे वर्णन प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती यानी केले आहे. एकदा नामधारक सिध्दाना विचारतो भूमीवर अनेक प्रख्यात तीर्थे असताना नृसिंहसरस्वती या गाणगापूर क्षेत्रात कां म्हणून राहिले. तेव्हा नृसिंह सरस्वती यानी सर्व भक्ताना दिपवाळीच्या पर्वकाळी त्रिस्थळीचे स्नान करण्यास सांगितले. असे म्हणुन गया, प्रयाग आणि वाराणसी या यात्रेस निघावे अशी आज्ञा केली.

नृसिंहसरस्वतीनी गाणगापूर परिसरातच सर्व तीर्थे आहेत असे सांगून गाणगापूर क्षेत्राची माहिती दिली. सर्व पवित्र तीर्थाचे महत्व सांगितले.

भीमा अमरजा संगम:

भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून २ ते ३ किलोमीटर आहे. या संगम स्थानी “श्री नृसिंह सरस्वती” नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित. निर्गुणमठाच्या पादुकादर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते.
गाणगापुरातील भीमा व अमरजा या दोन नद्यांचा संगम आहे. या संगमात ठारकूल हे तीर्थ आहे. या ठिकाणी भीमानदी ही उत्तर वाहिनी आहे. भीमा अमरजा या दोन नद्या ह्मणजे गंगा व यमुनाच आहेत. या तीर्थाचे महत्व खूप आहे काशीपेक्षा या ठिकाणी स्नान केल्यास शतपटीने पुण्य प्राप्त होते. असे सांगून नृसिंहसरस्वतीनी अमरजा नदीचे आख्यान भक्तांना सांगितले. 

१) षटकुल तीर्थ:
जालंधर पुराणातील ही कथा आहे. जालंधर नावाच्या महापराक्रमी राक्षसाने समस्त पृथ्वी जिंकली. इंद्राचा पराभव करून सर्व देवताना पळवून लावले. देव दैत्या मध्ये घनघोर युध्द झाले. अनेक देवतांचा वध झाला इंद्र शिवाकडे गेला व सर्व वृतांत सांगितला. इंद्र म्हणाला आम्ही दैत्याना मारतो पण त्यांचे रक्त भूमीवर सांडत असताना प्रत्येक रक्त बिंदू मधून राक्षस निर्माण होतात. राक्षस सैन्य वाढतच जाते. तीन ही लोक सर्व राक्षसानी व्याप्त झाले आहेत. इंद्राचे हे वचन ऐकून महादेव कृध्द झाले. दैत्यांचे निर्दाळन करण्या साठी स्वत: निघाले. इंद्र म्हणाला आपण सर्व दैत्य माराल पण मृत देवाना जीवन प्राप्त करून देण्याची व्यवस्था करावी. महादेव संतुष्ट झाले. अमृत वचन बोलून संजीवन उदकाने भरलेला एक घट इंद्राला दिला. इंद्राने ते उदक देवतांच्या वर शिंपडले. सर्व देवता जाग्या झाल्या. घरात अमृत शिल्लक होते. ते घेवून जात असताना अचानक भूमीवर पडले. अमृताच्या प्रभावाने भूमीवर एक नदी निर्माण झाली. त्या नदीचे नाव संजीवनी असे पडले. मृत्युपासून सुटका करण्याऱ्या या नदीचे नाव अमरजा असे पडले. यामुळे नृसिह सरस्वती म्हणाले या नदीत जे स्नान करतात त्यांना काळ मृत्यू अपमृत्यु होत नाही. स्नान करणारा शतायुषी होतो. त्यांची पातके नष्ट होतात. अशी ही अमृत नदी या संगम स्थानात भीमेशी मिळाली आहे. म्हणून हे तीर्थ प्रयाग तीर्था प्रमाणे आहे. कार्तिक व माघ महिना हा या स्नानास पर्वर्णी काळ आहे. ग्रहण सांगता सोमवती आमावास्या, पुण्य तिथी, एकादशी या वेळी या नदीत स्नान करणे अत्यंत पुण्यप्रद आहे.

२) नृसिंह तिर्थ (संगमेश्वर):
कल्प वृक्षाची पूजा करून मनोहर तीर्थात स्नान करून संगमेश्वर या ठिकाणी शिवमंदिर आहे. नंदीला नमस्कार करून या शिवाला प्रदक्षिणा करावी. शैल्य पर्वतावरील मल्लीकार्जुन समजून याची अर्चना करावी. त्या योगे इंद्रपदाची प्राप्ती होते. असे महत्व या शिवालयाचे आहे.

३) भागिरथ तीर्थ (वाराणसी तीर्थ):
संगमेश्वर पूजा करून १/२ कोस अंतरावर नागेशी म्हणुन एक गाव आहे. या ठिकाणी वाराणसी हे तीर्थ आहे. नृसिंह सरस्वतीनी या संदर्भात एक प्राचीन आख्यान सांगितले. पूर्वी भारद्वाज गोत्राचा एक ब्राह्मण होता. विरक्त असुन नित्य शिवोपासना करीत होता. सर्व संग त्याग करून देहाची पर्वा न करीता तो हिंडत असे. शिवानी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले होते. त्या विप्रास लोक वेडा समजत कारण त्याचे वागणे सामान्य लोका प्रमाणे नव्हते. त्याला दोन भावंडे होती एकाचे नाव ईश्वर तर दुसऱ्याचे नाव पांडुरंगेश्वर असे होते. ते आपल्या या वेडसर भावाला विचारित नसत. एकदां दोघे काशीला जाण्यास निघाले. त्यानी या वेडसर बंधूला येतोस का म्हणून विचारले. ब्रह्मज्ञानी असा तो वेडसर म्हणाला तुम्ही काशीला जावूं नका विश्वेश्वर माझ्या जवळच आहे. चला मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवितो. असे म्हणून विप्राने स्नान केले. विश्वेश्वर प्रसन्न झाला. तेव्हां तो विप्र म्हणाला आम्हास आपले नित्य दर्शन व्हावे. इश्वर प्रसन्न झाला. प्रत्यक्ष काशीक्षेत्र प्रकट झाले. मनकर्णिका कुंड तयार झाले. त्यातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली. या ठिकाणी भीमा उत्तरवाहिनी आहे. बाण या स्वरूपात शिवलिंग प्रकट झाले. कुंडातून भागिरथी प्रकट झाली. ज्या प्रकारे काशी विश्वेश्वराची लक्षणे वाराणसी मध्ये आहेत, त्या प्रकारे लक्षणे प्रकट झाली. भीमा नदीचा व मनिकर्णिका कुंडातून प्रकट गंगेचा संगम झाला. दोनही बंधूना आपल्या बंधूची महती समजली . ते त्याला ज्ञानी समजू लागले. तो म्हणाला आता काशीला कां जात आहात. सर्वानी काशी म्हणून या ठिकाणी अर्चना करावी. असे प्रत्यक्ष शिवानी मला सांगितले आहे. मला भ्रांत म्हणा किंवा गोसावी म्हणा. असे म्हणून त्या विप्राने बंधूना पंढरपुरास जाण्यास सांगितले. पुंडलिकाची आराधना करावी असे सांगितले. त्यांचे आराध्ये असे उपनाव झाले. प्रतिवर्षी काशीला न जाता येथेच यावे असे सांगितले.
नृसिंहसरस्वती म्हणतात असे हे काशीतीर्थ तया वाराणसीतीर्थ आहे. तुम्ही कोणताही संशय न धरता या ठिकाणी स्नान करा व मुक्त व्हा.

४) पाप विनाशिनि तीर्थ:
गाणगापूर क्षेत्रातील हे महान तीर्थ आहे. नावा प्रमाणे या तीर्थात स्नान केले असताना पाप विनाश होतो. नृसिंह सरस्वतीची बहीण रानाईस त्यानी या तीर्थात स्नान करण्यास सांगितले. तिचे कुष्ठ दूर झाले. वैडुर्य (बिदर) नगराचा यवन राजाला पण या तीर्थावर येण्यास नृसिंहसरस्वतीनी सांगितले होते. त्याच्या स्फोटकाची निवृत्ती झाली. तो पुण्य प्रद होवून मुक्त झाला.
रत्नाईचे कुष्ठ निवारण सर्वाना प्रत्यक्ष पाहिले असे हे पाप विनाशिनी तीर्थ गाणगापूर क्षेत्राचे महत्वाचे तीर्थ आहे.

५) कोटी तीर्थ:
जंबूद्वीपी जितकी तीर्थे । एकेक महिमा अपरितितो । तितुकिया वारु कोटीतीर्थे । विस्तार असे सांगता ।। ८७ ।। गु.च. अ. ४८

कोटी तीर्थाचे असे अपार महत्व आहे. पर्वकाळी स्नान करावे. दानादी कार्य करावे असे महत्व या तीर्थाचे आहे. कोटीगुणानी दान फळ प्राप्त होते. असे हे कोटी तीर्थ.

६) रुद्रपाद तीर्थ:
कोटी तीर्थापुढे असलेले हे रुद्रपाद तीर्थ आहे. गयातीर्थाचे महत्व चा ठिकाणी आहे. वेणीदान, पितृकर्म आदी गया तीर्थाचे विधि या ठिकाणी केल्यास कोटी गुणाने लाभ होतो व कोटी जन्माचे पाप नष्ट होते. इतके महत्वाचे हे तीर्थ आह.

७) चक्र तीर्थ:
हे चक्र तीर्थ आतिविशेष आहे. या तीर्था जवळ केशवाचे सांनिध्य आहे. या ठिकाणी स्नान केल्याने ज्ञान वृध्दी होते. अस्थि विसर्जन केल्या असतां त्या चक्रांकित होतात. मृताला मोक्ष प्राप्त होतो. द्वारकेच्या गोमती नदी मध्ये अस्थी चक्रांकीत होतात. त्या पेक्षा चौपट गुणानी युक्त असे हे तीर्थ आहे. नृसिंहसरस्वतीनी सर्वाना या तीर्थात स्नान करण्यास सांगितले.

८) मन्मथ तीर्थ:
गाणगापूर क्षेत्राच्या पूर्व भागात कल्लेश्वर म्हणून महादेवाचे स्थान आहे. याचे महात्म्य गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्र इतके आहे. मन्मथ तीर्थावर स्नान करून कल्लेश्वराचे दर्शन घ्यावे. त्याची पूजा करावी. प्रजा वृध्दी व अष्ट ऐश्वर्याची प्राप्ती भक्ताला प्राप्त होते. असे हे पुण्यप्रद तीर्थ आहे. श्रावण महीन्यात अभिषेक करावा कार्तिक महिन्यात दीपाराधना करावी अनंत पुण्य प्राप्त होईल अशा प्रकारे संगम व अष्टतीर्थाचे माहात्म्य प्रत्यक्ष नृसिंहसरस्वती, दत्तात्रेय यानी सांगितले आहे. गाणगापूर क्षेत्र हे अशाप्रकारे एक पवित्र स्थान आहे. 

गाणगापुरातील मठ तर पवित्राहुन पवित्र स्थान आहे. या ठिकाणी नृसिंह सरस्वती २३ वर्षाचा प्रदीर्घ काळ वास्तव्य करुन होते. त्यांच्या निर्गुण पादुका या मठा मध्ये आहेत. सरस्वती गंगाधर म्हणतात.

कल्पवृक्षाने पूजोन। यावे आमुचे जेथे स्थान ।
पादुका ठेवितो निर्गुण । पूजा करावी
मनोभावे ।। २९ ।। गु.च. अ. ५१
प्रात: स्नान कृष्णातीरी। पंचनदीसंगम औदुबरी।
अनुष्ठान बरवे त्याक्षेत्री। माध्यानी येतो
भीमातीरी ।।१६ ।। गु.च. अ ५१

नृसिंहसरस्वती निजानंदास जाते वेळी त्यानी सर्वाना सांगितले, आम्ही नित्य मठात वास करून आहोत. दुपारी भीमातटी भिक्षेसाठी नृसिहसरस्वती येत असतात. म्हणुन गाणगापूरला भिक्षेचे अत्यंत महत्व आहे. सर्व भक्त भिक्षा करीत असतात.

आत्मलिंग शाळिग्राम जपमाळा सर्व साधने आजही गाणगापूरला नृसिंहसरस्वतीच्या रूपात मठात ठेवल्या आहेत. निर्गुण पादूका प्रत्यक्ष दत्तचरण आहेत. खरेतर गाणगापूर हे तीर्थ दत्तचरणा साठी प्रख्यात आहे.

संपूर्ण वर्षभर अनेक उत्सव होत असतात. अन्नदान धर्मिक कार्ये, नित्य आरत्या पालखी व इतर कार्यक्रम या तीर्थावर होत असतात.

गाणगापूर या तीर्थाचे आणखी एक विशेष म्हणजे पिशाच्य बाधा, मनारुग्ण, समंध पीडा या परिसरात दत्तात्रेयाच्या संनिध्यामुळे या ठिकाणी अशा शक्ती येत नाहीत पितृदोष, पिशाच दोष याचे निराकरण या ठिकाणी होते. बाराही महिने निरनिराळे उत्सव होत असल्याने गाणगापूर हे क्षेत्र नित्यदर्शन करण्यासाठी प्रसिध्द आहे. पर्व काळ विशेष समारंभ या वेळी विशेष फल असते. तरी केव्हांही गाणगापुरला गेले तरी नित्यमंगल असे हे क्षेत्र आहे. संगमावर नित्य गुरुचरित्र पारायणा साठी दत्तभक्त येत असतात. अश्वत्थ वृक्षा खाली ते पारायण करतात.

भस्माचा डोंगर

गाणगापूरात संगमाजवळ एक टेकडी आहे. भस्माचा डोंगर म्हणून ती प्रसिध्द आहे. भगवान परशुरामाने या ठिकाणी अनेक यज्ञ केले त्या यज्ञभस्माचा हा पर्वत आहे असे सांगितले जाते. गाणगापूरचा प्रसाद म्हणून हे भस्म लोक बरोबर नेत असतात. प्राचीन काळा पासून अनेक विभूतीनी भीमा अमरजा संगमावर तपसाधना केली आहे. म्हणून गाणगापूर हे क्षेत्र तपोभूमी म्हणून पण प्रख्यात आहे. तपोभूमी दत्तभूमी पुण्यभूमी अशी ही भूमी म्हणजेच गाणगापूर क्षेत्र किंवा गंधर्वपूर क्षेत्र हे प्रसिध्द आहे.

भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे. सदरील भूमीमध्ये अनेक ऋशी मुनींनी केलेली तप साधना यामुळे या तपोभूमितील “विभूती” अनेक भाविक घरी घेऊन जातात, त्याच प्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासठी येथील पाषाणा द्वारे रचना तयार करायची एक पद्धत येथे प्रचलीत आहे.

श्रीक्षेत्र गाणागापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो. हजारो वर्षांपासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते. त्याच यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झालेली आहे. आजपर्यंत लक्षावधी श्रीदत्तभक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेउनही ही भस्माची टेकडी आहे तशीच आहे.

श्रीक्षेत्र गाणगापूरच्या भस्माने पिशाच्च बाधा हटते. दृष्टिबाधा नाहीशी होते. रोगराई नाहीशी होती. हे भस्म संकटनाशक, दुरितहारक आहे. परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात. संन्यासीवृंद भस्मस्नानासाठी याच भस्माचा उपयोग करतात.

निर्गुण पादुका

दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी “श्री नृसिंहसरस्वती” महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपाचारांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.

“प्रसिद्ध आमुचा गुरु जगी । नृसिंह सरस्वती विख्यात ॥
ज्याचे स्थान गाणगापूर । अमरजा संगम भीमातीर ॥”

श्रीक्षेत्र गाणगापुराला ‘दत्तभक्तांचे पंढरपूर’ म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. ‘निर्गुण पादुका’च्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे.

आज श्री क्षेत्र गाणगापुरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिह सरस्वती  निवासास होते. तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत आज ती गुफा बंद केलेली आहे. पण पूर्वीचे पुजारी सांगत की, त्या  ठिकाणी भगवान श्री नृसिंह स्वामी महाराजांनी  स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली होती. तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र, स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत. पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिणून बंद करण्यात आली.

श्रीनृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्च विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते. तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करुन श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवीत आहेत.

श्रीनिर्गुण पादुका मंदिर (अथवा श्रीगुरूंचा मठ) हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे. या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे. मंदिराच्या पूर्वेस व पश्र्चिमेस दोन महाद्वारे आहेत. पश्र्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजविला जातो. नव्यानेच बांधण्यात आल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे.

श्रीनिर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्या खाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्र्चिमेस अश्र्वत्थ वृक्ष आहे. वृक्षाभोवताली नागनाथ, मारुती व तुलशीवृंदावन आहे. मठात मंदिर सेवेकऱ्यांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवऱ्या आहेत. त्यांपैकी पाच पूर्वेस, सात उत्तरेस व एक पश्र्चिमेस आहे. मठाच्या दक्षिणभागी श्रीगुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे. त्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे.

आत पश्र्चिमेकडील कोनाड्यात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वत: श्रीनृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे. या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्र्चिमाभिमुख आहे. या दरवाज्यातून ओणव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो. या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रैमूर्तींचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्र्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्रीगुरुंच्या ‘निर्गुण पादुका’ ठेवलेल्या आहेत. या पादुका सुट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस, काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत.

श्रीगुरुचरित्रात श्रीगुरू आपल्या निर्गुण पादुकांची व गाणगापूर माहात्म्याची ग्वाही देताना म्हणतात –

“मठी आमुच्या ठेविती पादुका । पुरवितील कामना ऐका ।
अश्र्वत्थ वृक्ष आहे निका । तो सकळिकांचा कल्पतरू ॥
कामना पुरविल समस्त । संदेह न धरावा मनात ॥
मनोरथ प्राप्त होतील त्वरित । ही मात आमुची सत्य जाणा ॥
संगमी करूनिया स्नान । पूजोनी अश्र्वत्थ नारायण ।
मग करावे पादुकांचे अर्चन । मनकामना पूर्ण होतील ॥
विघ्नहर्ता विनायक । आहे तेथे वरदायक ॥
तीर्थे असती अनेक । पावाल तुम्ही सुख अपार ।

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्या वेळेस श्रीशैल यात्रेस निघाले त्या वेळी सर्व भक्तांच्या, शिष्यांच्या आग्रहावरून, हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या ‘निर्गुण पादुका’ इथे ठेवल्या. या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्या वेळेस श्रीदत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरीत्या या पादुकांद्वारा करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण, निराकार असते. म्हणून या पादुकांना ‘निर्गुण पादुका’ म्हणतात. भक्तकल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य-दु:खे व अटळ संकटे निवारण झालेली आहेत.

श्रीनृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा-अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्येस साधारणत: ३ कि.मी.वर आहे. श्रीगुरू ज्या अश्र्वत्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्याच स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. याच मंदिरात अश्र्वत्थवृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे.

श्रीगाणगापूर क्षेत्राच्या पूर्वभागात श्रीकल्लेश्र्वर मंदिर आहे. हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे. इथला पुजारी नरकेसरी कल्लेश्र्वराशिवाय अन्य कुणाला मानत नसे. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला.

श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते. 

इथल्या देवस्थानचे पुजारी सत्त्वगुणी आहेत. ते यात्रेकरूंची धार्मिक कृत्ये, अभिषेक, पूजा, माधुकरी, नैवेद्य, ब्राह्मणभोजन वगैरे व्यवस्था चांगल्याप्रकारे करतात.

श्रीक्षेत्र गाणागापुराला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात. स्वत: श्रीनृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत.

‘वसती रानी संगमासी । जाती नित्य भिक्षेसी ॥
तया गाणगापुरासी । माध्यान्हकाळी परियेसा ॥’

असा श्रीगुरुचरित्रात उल्लेख आहे. दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्रीमहाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. परंतु साक्षात परमेश्र्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यशाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. श्रीदत्तमहाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते. श्रीक्षेत्र गाणागापूर म्हणजे श्रीनृसिंह सरस्वतींची लीलाभूमी. अनेक भक्तांची दु:खे, संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले. त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्त्व आलेले आहे. भीमा-अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. गाणगापूरचा परिसरही श्रीक्षेत्र नरसोबावाडीप्रमाणे नितांत रमणीय आहे.

नित्त्यक्रम

श्रीक्षेत्र गाणगापूर येथील नित्यक्रम पुढीलप्रमाणे असतो – रोज पहाटे तीन वाजता काकड आरती होते. त्यानंतर साडेपाच ते सहाच्या सुमारास कर्पुरारती होते. साडेसहा वाजता तीर्थारती होते. इथे पादुकांवर पूजेचे उपचार होत नाहीत. पादुकांवर पाणी घातले जात नाही. केवळ अष्टगंध व केशरी गंध लावतात. इतर उपचार ताम्हणात पाणी सोडून करतात. साडेबाराच्या सुमारास श्रीदत्तप्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो. नंतर भक्तमंडळी माधुकरी मागावयास जातात.

सायंकाळी सहा-साडेसहा वाजता दिवे लागतात. रात्रौ साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत श्रीदत्तप्रभुंच्या पालखीचा सोहळा चालतो. प्रथम पूजा, आरती झाल्यानंतर अलंकाराने सुशोभित अशी श्रीदत्तप्रभूंची मूर्ती पालखीत बसवतात. मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घालतात. याच काळात पालखीसमोर भजनसेवाही होते. त्यानंतर श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीकृत करुणा त्रिपदी, पदे, अष्टके आणि शेजारती म्हणण्याचा कार्यक्रम होतो. नंतर तीर्थप्रसाद दिला जातो.


श्रीक्षेत्र गाणगापूरला साजरे होणारे उस्तव

श्रीक्षेत्र गाणगापूरला पुढील उत्सव साजरे केले जातात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला (श्रीगुरुपौर्णिमेला) श्रीव्यासपूजा साजरी करतात. संपूर्ण श्रावण महिनाभर भक्तमंडळी श्रीगुरुचरित्राचे पारायण करतात. मठात रोज शिवलिंगावर रुद्राभिषेक होतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी (गणेश चतुर्थीच्या दिवशी) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा करतात. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी श्रींची पालखी भक्तमंडळींसह सायंकाळी श्रीकल्लेश्र्वर मंदिरात जाते. रात्रौ आठ वाजता परत येते.

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतारसमाप्तीचा उत्सव आश्र्विन वद्य द्वादशीला म्हणजे गुरुद्वादशीला मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्या वेळेस महाप्रसाद वाटला जातो.

नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्व भाविक भक्त अष्ट तीर्थ स्नान करण्यासाठी जातात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची पालखी संगमावर जाते. त्याच रात्री भजनाच्या व नामस्मरणाच्या गजरात ती परत मठात येते. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी श्रीदत्तजयंतीनिमित्त येथे मोठा उत्सव होतो. दुपारी बारा वाजता दत्तजन्म साजरा करण्यात येतो. या उत्सवाला बाहेरगावची माणसे फार मोठ्या प्रमाणावर आलेली असतात. पौष शुद्ध द्वितीयेला श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.

माघ वद्य प्रतिपदा हा श्रीक्षेत्र गाणगापूर येथे साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव होय. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी श्रीमहाराज श्रीशैल्यगमनास निघतात. चतुर्थीच्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची पालखी रुद्रपाद तीर्थांहून पुनश्र्च मठात येण्यास निघते. हा सर्व सोहळा अत्यंत आनंदमय, मनाला स्फूर्ती देणारा असतो.

भक्तांच्या निवासाची सोय इथल्या वेगवेगळ्या धर्मशाळांतून अत्यंत माफक दरात केली जाते. या सर्व धर्मशाळा देवस्थान कमिटीच्या मालकीच्या आहेत. श्रीवासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा अलीकडेच उभारण्यात आली आहे. प. पू. श्रीदत्तात्रेयशास्त्री कवीश्र्वरांच्या हस्ते या धर्मशाळेच्या वास्तूचे पूजन झालेले आहे. श्रीविश्र्वेश्र्वर मठ, श्री दंडवते स्वामीमहाराजांचा मठ, श्रीशंकरगिरी महाराज मठ वगैरे मठांतूनही भक्तांच्या राहण्याची सोय होऊ शकते.

श्रीगुरुचरित्र ग्रंथात, गाणगापुरात घडलेल्या बऱ्याच लीला आलेल्या आहेत. पूर्वावतारात भेटलेल्या रजकाला स्वामींनी या अवतारात श्रीक्षेत्र गाणगापूरला दर्शन देऊन त्याच्या मांडीचा फोड बरा केला. विश्रांती कट्ट्यावर विश्रांती घेत असताना शेतकऱ्यावर कृपा करून त्याला अमाप धान्याची प्राप्ती करून दिली. दीपावलीच्या दिवशी ते एकाच वेळी आठ ठिकाणी गेले. नरहरी कवीश्र्वराला परमेश्र्वराचे दर्शन घडविले तर विणकरास एका क्षणात श्रीशैल मल्लिकार्जुनाचे दर्शन झाले. औदुंबराच्या शुष्क काष्ठास पालवी आणली. साठ वर्षांच्या वांझेस पुत्रप्राप्ती घडविली. गरीब भास्कराच्या पाच जणांना पुरेल एवढ्या सिद्धान्नात हजारो लोकांना भोजन घातले. या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अशा अनेक लीला सांगता येतील.

मुंबई-चेन्नई रेल्वेच्या मार्गावर गाणगापूर हे स्टेशन (स्थानक) लागते. पुणे-रायचूर मार्गावर गुलबर्गा स्टेशनपूर्वी गाणगापूर स्टेशन आहे. पुण्यापासून या स्टेशनचे अंतर ३२७ कि.मी आहे. तेथून पुढे २१ कि.मी श्रीक्षेत्र गाणगापूर आहे. तेथे जाण्यासाठी कर्नाटक राज्याच्या एस. टी. गाड्यांची सतत ये – जा चालूच असते. मणीगिरी तथा मणिचलच्या पायथ्याशी हे पवित्र तीर्थक्षेत्र वसलेले आहे.

गाणगापूरला संगमस्थानी आढळणारे गरुड सदृश्य पक्षी

इ.स. १४५८ साली, भगवन् श्रीदत्तात्रेयांचा कलियुगातील दुसरा अवतार श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराज, यवन राज्य आल्यानं (कठिण दिवस युगधर्म! म्लेंच्छराज्य क्रूरकर्म! प्रगट असता घडे अधर्म! समस्त म्लेंच्छ येथे येती! – श्रीगुरुचरित्र अ. ५०, ओ. २५८) आणि आपली अपार ख्याती झाल्यानं भक्त-अभक्त सगळेच वरदान मागायला येतील या कारणास्तव (प्रगट झाली बहु ख्याती! आता रहावे गौप्य आम्ही! – श्रीगुरुचरित्र अ.५०, ओ.२५४), अवतारकार्य समाप्तीसाठी पाताळगंगेतून कदलीवनात जायला निघाले. 

त्यावेळी गाणगापूरातील समस्त जनसमुदाय स्फुंदूनस्फुंदून रडायला लागला. “स्वामी आमुते सोडून! केवी जाता यतिराया!” (श्रीगुरुचरित्र अ. ५१, ओ.९) अशी आर्त विनवणी त्यांनी श्रीगुरूंना केली. त्यावेळी परमदयाळू श्रीगुरुंनी “आम्ही या ठिकाणीच आहोत!” (आम्ही असतो याचि ग्रामी! नित्य स्नान अमरजासंगमी! वसो मठी सदा प्रेमी! गौप्यरुपे अवधारा! – श्रीगुरुचरित्र अ. ५१, ओ. १४) असं आश्वासन त्या दुःखी जनांना दिलं. 

त्याची साक्ष पटविण्यासाठी, श्रीगुरुंनी सांगितलं, “आम्ही वसतो सदा येथे! ऐसे जाणा तुम्ही निरुते! दृष्टी पडती गरुत्मते! खूण तुम्हा सांगेन!” (श्रीगुरुचरित्र अ. ४८, ओ. ३८) अर्थात्, “आम्ही विष्णूअवतार असल्याने त्याची खूण म्हणून आमचं प्रिय वाहन गरुडासारखे दिसणारे पक्षी या ठिकाणी दिसतील.” आजही ५०० वर्षांनंतरही हे पक्षी गाणगापूरात दिसतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top