श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.
“अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।”
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे आहेत.
पारायण काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम
गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी नियम
१. श्रीगुरुचरित्र साप्ताह करताना शक्यतो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवावा. साप्ताहाच्या सुरुवातीला, साप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यास संध्याकाळी श्रीगुरुचरित्राची पूजा आणि श्रीगुरुची पंचपदी व आरती करावी.
२. श्री दत्तजयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचरित्राचा साप्ताह करायचा असेल त्यांनी समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता, जयंतीच्या दिवशी केवळ चौथ्या अध्यायाचे पारायण करून पुष्पवृष्टी वगेरे करून आनंद करावा.
३. सप्ताहाच्या ७ दिवसाचा व्रतस्थपणा पदरात पडण्यासाठी समाराधना आठवे दिवशी करणे चांगले.
४. घरात जागा एकांत हवी तशी नसेल तर श्री दत्त मूर्ती असलेल्या मंदिरात साप्ताह करावा.
५. उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे.
६. शक्य असल्यास घरी किंवा देवघरात साप्ताह सुरु करावा.
७. अखंड दीप असावा. साप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा.(वाचन चालू असे पर्यंत)
८. समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राम्हण भोजन द्यावे.
९. सात दिवसापर्यंत सोवळ्या ओवळ्याचे नियम पाळावेत.
- साप्ताह वाचण्यास बसल्यानंतर मध्येच आसन सोडून उठू नये.
- दुसऱ्याकडे बोलू नये.
- हविषान्न एक वेळ घ्यावे. संध्याकाळी फक्त दुध घ्यावे. हविषान्न म्हणजे दुध भात. खारट – तिखट – आंबट (दही, ताक इत्यादी) खाऊ नये. साखरेचा वापर केल्यास चालेल गुळ वापरू नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप साखर घेता येते.
- ब्रम्हचर्य पालन करावे.
- भूमिशयन म्हणजेच पलंग किंवा खाटेवर निजू नये, गादी घेऊ नये, चटई किंवा पांढरे घोंगडे अथवा सतरंजी वर झोपावे, सप्ताहाच्या ७ वे दिवशी समाराधना करण्यास हरकत नाही, त्या दिवशी महानैवेद्य झालाच पाहिजे.
धर्मसिंधूंत सांगितलेले हविष्यान्नाचे पदार्थ
साळीचे तांदूळ, जव, मूग, तीळ, राळे, वाटणे ई .धान्ये; पांढरा मुळा, सुरण ई. कंद; सैंधव व समुद्रोत्पन्न अशी लवणे; गायींची दही, दुध आणि तूप; फणस, आंबा, नारळ, हरीतकी, पिंपळी, जिरे, सुंठ, चिंच, केळे, रायआंवळे ही फळे व साखर ही सर्व अतैलपक्व हविष्ये जाणावी (गायींचे ताक व म्हशीचे तूप ही हविष्ये आहेत असेंही कोणी म्हणतात.) – धर्मसिंधु प्रथम परिच्छेद व्रतपरिभाषा.
अग्निपुराणांत सांगितलेले हविष्यान्नाचे पदार्थ
साळीचे तांदूळ, साठ दिवसांनी पिकणाऱ्या भाताचे तांदूळ, मूग, वाटणे, तिळ, दूध, सांवे, तृणधान्य व गहूं हे व्रताविषयी हितकारक आहेत. कोहळा, भोंपळा, वांगे, पोईशाक, घोसाळे ही वर्ज्य करावी. भिक्षा मागून मिळालेले अन्न, पीठ, कण्या, शाक, दही तूप, मधु, सांवे, साळीचे तांदूळ, तृणधान्य, यव, मुळा, तांदुळजा हे पदार्थ हविष्यव्रत, नक्त इत्यदि विषयी व अग्निकार्य इत्यदि विषयी हितकारक होत.
गुरुचरित्र – पारायण कसे करावे ?
- वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे.
- वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे.
- वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.
- श्रीदत्तात्रायांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.
- सप्ताहकाळात ब्रम्हाचार्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)
- रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव आहे.
- वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
- सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
- सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.
गुरुचरित्र – पारायण रोज किती अध्याय वाचावे?
५२ अध्यायी गुरुचरित्र असेल त्यांनी
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस पहिला अध्याय १ ते ७
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस दुसरा अध्याय ८ ते १८
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस तिसरा अध्याय १९ ते २८
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस चौथा अध्याय २९ ते ३४
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस पांचवा अध्याय ३५ ते ३७
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस सहावा अध्याय ३८ ते ४३
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस सातवा अध्याय ४४ ते ५२
५३ अध्यायी गुरुचरित्र असेल त्यांनी
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस पहिला अध्याय १ ते ९
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस दुसरा अध्याय १० ते २१
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस तिसरा अध्याय २२ ते २९
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस चौथा अध्याय ३० ते ३५
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस पांचवा अध्याय ३६ ते ३८
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस सहावा अध्याय ३९ ते ४३
- श्री गुरुचरित्र पारायण – दिवस सातवा अध्याय ४४ ते ५३
स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा श्री. प. पु. वासुदेवानंद सरस्वतीचा निष्कर्ष आहे.
काही विशिष्ट हेतूसाठी अध्याय
- सद्गुरू प्राप्तीची तळमळ व्यक्त होण्यासाठी पहिला अध्याय.
- परमार्थिक गुरुकृपेसाठी २ रा अध्याय.
- आरोग्य साठी १३ वा अध्याय.
- आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ १४ वा अध्याय.
- संततीच्या आरोग्याबाबतची काळजी निवारणासाठी २० वा आणि २१ वा अध्याय.
- पुत्रप्राप्तीसाठी ३९ वा अध्याय.
अशी काही अध्यायाची वैशिष्टे आहेत.
टीप:- श्री गुरुचरित्र पारायण झाल्यावर संध्याकाळी श्रीगुरुना प्रिय असणारे गायन म्हणजे पंचपदीचे वाचन/गायन रोज करावे.
ज्यांना सवड नसेल त्यांनी अवतर्णिका वाचावी त्याच्यासाठी देखील वेळ नसेल तर त्यानी किमान ११ ओळी तरी श्री गुरूचरित्राचे वाचन करावे.
“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”
॥ वंदेऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपाद युग्मांबुजम ॥
श्री गुरुदेव दत्त