५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय तेविसावा
श्रीगणेशाय नमः ।
विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगीयाते पुसत । पुढील कथा विस्तारत । निरोपावी दातारा ॥१॥
सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरूची अगम्य लीला । तोचि विप्रे प्रकट केला । जेणे वांझ महिषी दुभिली ॥२॥
तया ग्रामी येरे दिवसी । क्षारमृत्तिका वहावयासी । मागो आले तया महिषीसी । द्रव्य देऊ म्हणताती ॥३॥
विप्र म्हणे तयासी । नेदू दुभते महिषीसी । दावीतसे सकळिकांसी । क्षीरभरणे दोनी केली ॥४॥
करिती विस्मय सकळ जन । म्हणती वांझ दंतही । काल होती नाकी खूण । वेसणरज्जू अभिनव ॥५॥
नव्हती गर्भिणी वांझ महिषी । वत्स न होता दुभे कैसी । वार्ता फाकली विस्तारेसी । कळली तया ग्रामाधिपतीस ॥६॥
विस्मय करुनी तये वेळी । आला अधिपती तयाजवळी । नमोनिया चरणकमळी । पुसतसे वृत्तान्त ॥७॥
विप्र म्हणे तयासी । असे संगमी संन्यासी । त्याची महिमा आहे ऐसी । होईल ईश्वर अवतार ॥८॥
नित्य आमुच्या मंदिरासी । येती श्रीगुरु भिक्षेसी । वरो नव्हती त्या दिवशी । क्षीर आपणा मागितले ॥९॥
वांझ म्हणता रागावोनि । त्वरे क्षीर दोहा म्हणोनि । वाक्य त्याचे निघता क्षणी । कामधेनूपरी जाहली ॥१०॥
विप्रवचन परिसोनि । गेला राजा धावोनि । नमन केले साष्टांगेसी । एका भावे करोनिया ॥१२॥
जय जयाजी जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । तुझा महिमा अपरंपारु । अशक्य आम्हा वर्णिता ॥१३॥
नेणो आम्ही मंदमति । मायामोहअंधवृत्ति । तू तारक जगज्ज्योती । उद्धरावे आम्हांते ॥१४॥
अविद्यामायासागरी । बुडालो असो घोर दरी । विश्वकर्ता तारी तारी । म्हणोनि चरणी लागला ॥१५॥
विश्वकर्ता तूचि होसी । हेळामात्रे सृष्टो रचिसी । आम्हा तु दिसतोसी । मनुष्यरूप धरोनि ॥१६॥
वर्णावया तुझा महिमा । स्तोत्र करिता अशक्य आम्हा । तूचि रक्षिता केशव्योमा । चिन्मयात्मा जगद्गुरु ॥१७॥
येणेपरी श्रीगुरूसी । स्तोत्र करी बहुवसी । श्रीगुरुमूर्ति संतोषी । आश्वासिती तये वेळी ॥१८॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया रायाते पुसती । आम्ही तापसी असो यति । अरण्यवास करितसो ॥१९॥
या कारणे आम्हापासी । येणे तुम्हा संभ्रमेसी । पुत्रकलत्रसहितेसी । कवण कारण सांग म्हणती ॥२०॥
ऐकोनिया श्रीगुरुचे वचन । राजा विनवी कर जोडून । तू तारक भक्तजन । अरण्यवास कायसा ॥२१॥
उद्धरावया भक्तजना । अवतरलासी नारायणा । वासना जैसी भक्तजना । संतुष्टावे तेणेपरी ॥२२॥
ऐशी तुझी ब्रीदख्याति । वेदपुराणी वाखाणिती । भक्तवत्सला श्रीगुरुमूर्ति । विनंती माझी परिसावी ॥२३॥
गाणगापुर महास्थान । स्वामी करावे पावन । नित्य तेथे अनुष्ठान । वास करणे ग्रामात ॥२४॥
मठ करोनि तये स्थानी । असावे आम्हा उद्धरोनि । म्हणोनि लागे श्रीगुरुचरणी । भक्तिपूर्वक नरेश्वर ॥२५॥
श्रीगुरु मनी विचारिती । प्रगट होणे आली गति । क्वचित्काळ येणे रीती । वसणे घडे त्या स्थानी ॥२६॥
भक्तजनतारणार्थ । अवतार धरिती श्रीगुरुनाथ । राजयाचे मनोरथ । पुरवू म्हणती तये वेळी ॥२७॥
ऐसे विचारोनि मानसी । निरोप देती नराधिपासी । जैसी तुझ्या मानसी । भक्ति असे तैसे करी ॥२८॥
गुरुवचन ऐकोनि । संतोषोनि नृप मुनी । बैसवोनिया सुखासनी । समारंभे निघाला ॥२९॥
नानापरींची वाद्ये यंत्रे । गीतवाद्यमंगळतुरे । मृदंग टाळ निर्भरे । वाजताती मनोहर ॥३०॥
राव निघे छत्रपताकेसी । गजतुरंगश्रृंगारेसी । आपुले पुत्रकलत्रेसी । सवे यतीसी घेवोनि ॥३१॥
वेदघोष द्विजवरी । करिताती नानापरी । वाखाणिती बंदिकारी । ब्रीद तया मूर्तीचे ॥३२॥
येणेपरी ग्रामाप्रती । श्रीगुरु आले अतिप्रीती । अनेकपरी आरती । घेउनी आले नगरलोक ॥३३॥
ऐसा समारंभ थोर । करिता झाला नरेश्वर । संतोषोनि श्रीगुरुवर । प्रवेशले नगरात ॥३४॥
तया ग्रामपश्चिमदेशी । असे अश्वत्थ उन्नतेसी । ओस गृह तयापासी । असे एक भयंकर ॥३५॥
तया वृक्षावरी एक । ब्रह्मराक्षस भयानक । त्याचे भये असे धाक । समस्त प्राण्या भय त्याचे ॥३६॥
ब्रह्मराक्षस महाक्रूर । मनुष्यमात्र करी आहार । त्याचे भय असे थोर । म्हणोनि गृह ओस तेथे ॥३७॥
श्रीगुरुमूर्ति तये वेळी । आले तया वृक्षाजवळी । ब्रह्मराक्षस तात्काळी । येवोनि चरणी लागला ॥३८॥
कर जोडूनि श्रीगुरूसी । विनवीतसे भक्तीसी । स्वामी माते तारियेसी । घोरांदरी बुडालो ॥३९॥
तुझ्या दर्शनमात्रेसी । नासली पापे पूर्वार्जितेसी । तू कृपाळू सर्वांसी । उद्धरावे आपणाते ॥४०॥
कृपाळु ते श्रीगुरु । मस्तकी ठेविती करु । मनुष्यरूपे होवोनि येरु । लोळतसे चरणकमळी ॥४१॥
श्रीगुरु सांगती तयासी । त्वरित जावे संगमासी । स्नान करिता मुक्त होसी । पुनरावृत्ति नाही तुज ॥४२॥
गुरुवचन ऐकोन । राक्षस करी संगमी स्नान । कलेवरा सोडूनि जाण । मुक्त झाला तत्क्षणी ॥४३॥
विस्मय करिति सकळ लोक । म्हणती होईल मूर्ति येक । हरि अज पिनाक । हाचि सत्य मानिजे ॥४४॥
श्रीगुरु राहिले तया स्थानी । मठ केला श्रृंगारोनि । नराधिपशिरोमणी । भक्तिभावे पूजीतसे ॥४५॥
भक्तिभावे नरेश्वर । पूजा अर्पी अपरंपार । परोपरी वाद्यगजर । गीतवाद्येमंत्रेसी ॥४६॥
श्रीगुरु नित्य संगमासी । जाती नित्य अनुष्ठानासी । नराधीश भक्तीसी । सैन्यासहित आपण जाय ॥४७॥
एखाद्या समयी श्रीगुरूसी । बैसविती आपुल्या आंदोलिकेसी । सर्व दळ सैन्येसी । घेवोनि जाय वनांतरा ॥४८॥
माध्याह्नकाळी परियेसी । श्रीगुरु येती मठासी । सैन्यासहित आनंदेसी । नमन करी नराधिप ॥४९॥
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । भक्ताधीन आपण असती । जैसा संतोष त्याच्या चित्ती । तेणेपरी रहाटती ॥५०॥
समारंभ होय नित्य । ऐकती लोक समस्त । प्रगट झाले लोकांत । ग्रामांतरी सकळजनि ॥५१॥
कुमसी म्हणिजे ग्रामासी । होता एक तापसी । त्रिविक्रम भारती नामेसी । तीन वेद जाणतसे ॥५२॥
मानसपूजा नित्य करी । सदा ध्यायी नरहरी । त्याणे ऐकिले गाणगापुरी । असे नरसिंहसरस्वती ॥५३॥
ऐकता त्याची चरित्रलीला । मनी म्हणे दांभिक कळा । हा काय खेळ चतुर्थाश्रमाला । म्हणोनि निंदा आरंभिली ॥५४॥
ज्ञानमुर्ति श्रीगुरुनाथ । सर्वांच्या मनीचे जाणत । यतीश्वर निंदा आपुली करीत । म्हणोनि ओळखिले मनात ॥५५॥
सिद्ध म्हणे नामांकिता । पुढे अपूर्व असे कथा । मन करोनि निर्मळता । एकचित्ते परिस तु ॥५६॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । ऐकता होय मनोहर । सकळाभीष्ट पाविजे ॥५७॥
इति श्रीगुरुचरित्र । गाणगापुरी पवित्र । ब्रह्मराक्षसा परत्र । निजमोक्ष दीधला ॥५८॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे राक्षसमुक्तकरणं नाम त्रयोविंशोऽध्याः ॥२३॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
ओवीसंख्या ५८