५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय एक्कावन्नावा
श्रीगणेशाय नमः ।
नामधारक विनवी सिद्धासी । कथा सांगितली आम्हांसी । म्लेंच्छराजें श्रीगुरुसी । होतें नगरासी नेलें ॥१॥
तेथोन आले गाणगाभुवना । पुढील वर्तल्या निरुपणा । सांगा स्वामी कृपाघना । गुरुचरित्र आम्हांसी ॥२॥
सिद्ध म्हणे ऐक वत्सा । कथा असे अतिविशेषा । ऐकतां जाती सकळ दोषा । चिंतिलें काम्य पाविजे ॥३॥
राजाची भेट घेऊनि । श्रीगुरु आले गाणगाभुवनीं । योजना करिती आपुल्या मनीं । गुप्त रहावें म्हणोनिया ॥४॥
प्रगट झालों बहुवसी । राजा आला भेटीसी । उपजली भक्ति म्लेंच्छासी । नाना जाती येतील ॥५॥
म्हणोनि आतां गुप्त व्हावें । लोकमतें निघोनि जावें । पर्वतयात्रा म्हणोनि भावें । निघाले श्रीगुरु परियेसीं ॥६॥
गुप्त राहिले गाणगापुरीं । प्रगट दाविलें लोकाचारीं । निघाले स्वामी पर्वतगिरीं । शिष्यांसहित अवधारा ॥७॥
भक्तजन बोळवित । चिंता करीत अत्यंत । श्रीगुरु संबोखिती समस्त । रहावविती अतिप्रीतीनें ॥८॥
दुःख करिती सकळ जन । लागताती श्रीगुरुचरण । स्वामी आम्हांतें सोडून । केवी जातां यतिराया ॥९॥
भक्तजनांची तूं कामधेनु । आम्ही बाळक अज्ञानु । होतासि आम्हां निधानु । सोडोनि जातां श्रीगुरु ॥१०॥
नित्य तुझें करितां दर्शन । दुरितें जाती निरसून । जी जी कामना इच्छी मन । त्वरित पावे स्वामिया ॥११॥
बाळकातें सोडोनि माता । केवी जाय अव्हेरितां । तूं आमुचा मातापिता । नको अव्हेरुं म्हणताती ॥१२॥
ऐकोनि नानापरी विनंति । हांसते झाले श्रीगुरुमूर्ति । संबोखिती अतिप्रीतीं । न करा चिंता म्हणोनि ॥१३॥
आम्ही असतों याचि ग्रामीं । नित्य स्नान अमरजासंगमीं । वसों माध्यान्हीं मठधामीं । गुप्तरुपें अवधारा ॥१४॥
जे भक्त असती माझ्या प्रेमीं । त्यांतें प्रत्यक्ष दिसों आम्ही । लौकिकमतें अविद्याधर्मीं । बोल करितों श्रीशैलयात्रा ॥१५॥
प्रातःस्नान कृष्णातीरीं पंचनदी वृक्ष औदुंबरीं । अनुष्ठाना बिंदुक्षेत्रीं । माध्यान्हीं येतों भीमातटीं ॥१६॥
अमरजासंगमीं स्नान करोनि । पूजा घेऊं मठीं निर्गुणीं । चिंता न करा अंतःकरणीं । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥१७॥
ऐसें सांगती समस्तांसी । संदेह न धरावा मानसीं । गाणगाभुवनीं अहर्निशीं । वसों आम्ही त्रिवाचा ॥१८॥
जे जे जन भक्ति करिती । त्यांसी आमुची अतिप्रीति । मनकामना पावती । सिद्धवाक्य असे आमुचें ॥१९॥
अश्वत्थ नव्हे कल्पवृक्ष । संगमीं असे प्रत्यक्ष । तुमच्या मनीं जें अपेक्ष । त्वरित होय पूजितां ॥२०॥
कल्पवृक्षातें पूजोनि । मग यावें आमुचे स्थानीं । पादुका ठेवितों निर्गुणी । पूजा करा मनोभावें ॥२१॥
विघ्नहर चिंतामणी । त्यातें पूजितां एकमनीं । चिंतिलें फळ तत्क्षणीं । लाभे तुम्हां अवधारा ॥२२॥
समस्त विघ्नांचा अंतक । पूजा तुम्हीं विनायक । अष्टतीर्थें असती विशेख । आचरावीं मनोभावें ॥२३॥
संतोषकारक आम्हांप्रती । त्रिकाळ करावी आरती । भक्तजन जें इच्छिती । त्वरित होय अवधारा ॥२४॥
ऐसें सांगोनि तयांसी । निघालें स्वामी परियेसीं । भक्त परतोनि मठासी । आले चिंतित पायांतें ॥२५॥
चिंतित निघती मठांत । तेथें दिसती श्रीगुरुनाथ । लोक झाले विस्मित । म्हणती वस्तु त्रैमूर्ति ॥२६॥
यासी म्हणती जे नर । ते पावती यमपूर । सत्य बोलिले निर्धार । न कळे महिमा आम्हांसी ॥२७॥
सवेंचि पाहतां न दिसे कोणी । प्रेमळ भक्त देखती नयनीं । यापरी गौप्यरुप धरोनि । राहिले श्रीगुरु मठांत ॥२८॥
दृष्टान्त दाखविला भक्तांसी । पातले आपण श्रीपर्वतासी । पाताळगंगातीरासी । राहिले स्वामी परियेसा ॥२९॥
शिष्यांतें निरोपिती अवधारा । पुष्पांचें आसन त्वरित करा । जाणें असे पैलतीरा । ऐक्य होऊं मल्लिकार्जुनीं ॥३०॥
निरोप देतां श्रीगुरुमूर्ति । आणिलीं पुष्पें शेवंती । कुमुदें कल्हारें मालती । कर्दळीपर्णें वेष्टोनि ॥३१॥
आसन केलें अतिविचित्र । घातलें गंगेमध्यें पात्र । शिष्यां सांगती वेगवक्र । जावें तुम्ही गृहासी ॥३२॥
दुःख करीत येत सकळी । यांसी सांगती श्रीगुरु चंद्रमौळी । गाणगाग्रामीं असों जवळी । भाव न धरावा दुजा तुम्ही ॥३३॥
लौकिकमतें आम्ही जातों । ऐसें दृष्टान्तीं दिसतों । भक्तजनां घरीं वसतों । निर्धार धरा मानसीं ॥३४॥
ऐसें भक्तां संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथोनि । पुष्पासनीं बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥३५॥
कन्यागतीं बृहस्पति । बहुधान्य संवत्सरी ख्याति । सूर्य चाले उत्तर दिगंतीं । संक्रांति कुंभ परियेसा ॥३६॥
शिशिर ऋतु माघमासीं । असितपक्ष प्रतिपदेसी । शुक्रवारीं पुण्यदिवसीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥३७॥
श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज मठासी । पावतां खूण तुम्हांसी । प्रसादपुष्पें पाठवितों ॥३८॥
येतील पुष्पें जाती शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं । पूजा करावी अखंड रीतीं । लक्ष्मी वसों तुम्हां घरीं ॥३९॥
आणिक सांगेन एक खूण । गायनीं करी जो माझे स्मरण । त्याचे घरीं असे जाण । गायनप्रीति आम्हांसी ॥४०॥
नित्य जें जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । तयांचे घरी अखंडिती । आपण असों अवधारा ॥४१॥
व्याधि न होय त्यांचे घरीं । दरिद्र जाय त्वरित दुरी । पुत्रपौत्र श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥४२॥
ऐकतील चरित्र माझें जरी । वाचतील नर निरंतरी । लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मनांत ॥४३॥
ऐसें सांगोनि भक्तांसी । श्रीगुरु जहाले अदृशी । चिंता करिती बहुवशी । अवलोकिती गंगेंत ॥४४॥
ऐशी चिंता करितां थोर । तटाकीं पातले नावेकर । तिहीं सांगितला विचार । श्रीगुरु आम्हीं देखिले ॥४५॥
शिष्यवर्गासी मनोहर । व्यवस्था सांगती नावेकर । होतों आम्ही पैलतीर । तेथें देखिले मुनीश्वर ॥४६॥
संन्यास वेष दंड हातीं । नामें श्रीनृसिंहसरस्वती । निरोप दिधला आम्हांप्रती । तुम्हां सांगा म्हणोनि ॥४७॥
आम्हांस आज्ञापिती मुनि । आपण जातों कर्दळीवनीं । सदा वसों गाणगाभुवनीं । ऐसें सांगा म्हणितलें ॥४८॥
भ्रांतपणें दुःख करितां । आम्हीं देखिलें दृष्टान्ता । जात असतां श्रीगुरुनाथा । सुवर्णपादुकां त्यांचे चरणीं ॥४९॥
निरोप सांगितला तुम्हांसी । जावें आपुल्या स्थानासी । सुखी असावें वंशोवंशीं । माझी भक्ति करोनि ॥५०॥
प्रसादपुष्पें आलिया । घ्यावीं शिष्यें काढोनिया । ऐसें आम्हां सांगोनिया । श्रीगुरु गेले अवधारा ॥५१॥
ऐसें सांगती नावेकर । समस्त राहिले स्थिर । हर्षें असती निर्भर । प्रसादपुष्पें पहाती ॥५२॥
इतुकिया अवसरीं । आलीं प्रसादपुष्पें चारी । मुख्य शिष्यें प्रीतिकरीं । काढोनि घेतलीं अवधारा ॥५३॥
नामधारक म्हणे सिद्धासी । मुख्य शिष्य कोण उपदेशीं । विस्तारोनिया आम्हांसी । पुष्पें कोणा लाभलीं ॥५४॥
सिद्ध म्हणे नामधारका । शिष्य बहुत गुरुनायका । असती गाणगापुरीं ऐका । गेले शिष्य आश्रमा ॥५५॥
आश्रम घेती संन्यासी । त्यांसी पाठविलें तीर्थासी । तयांचीं नामें परियेसीं । सांगेन ऐका विस्तारोन ॥५६॥
बाळकृष्णसरस्वती । उपेंद्रमाधवसरस्वती । पाठविते झाले प्रीतीं । आपण राहिले संगमीं ॥५७॥
गृहस्थधर्म शिष्य बहुत । समस्त आपुले घरीं नांदत । त्रिवर्ग आले श्रीपर्वताप्रत । चवथा होतों आपण ॥५८॥
साखरे नाम सायंदेव । कवीश्वर-युग्में पूर्वभाव । नंदी नामें नरहरी देव । पुष्पें घेतलीं चतुर्वर्गी ॥५९॥
गुरुप्रसाद घेऊन । आले शिष्य चौघेजण । तींच पुष्पें मज पूजन । म्हणोनि पुष्पें दाखविती ॥६०॥
ऐसा श्रीगुरुचा महिमा । सांगतसे अनुपमा । थोडें सांगितलें तुम्हां । अपार असे सांगतां ॥६१॥
श्रीगुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुज विस्तारोनु । दुःख दरिद्र गेलें पळोनु । ऐसें जाण निर्धारीं ॥६२॥
ऐसें श्रीगुरुचरित्र । श्रवणीं कीर्तनी अतिपवित्र । सुखें नांदती पुत्रपौत्र । लक्ष्मीवंत होती जाण ॥६३॥
धर्म अर्थ काम मोक्ष । तयांसी लाभे प्रत्यक्ष । महा आनंद उभयपक्ष । पुस्तक लिहितां सर्वसिद्धि ॥६४॥
ऐसें सिद्धें सांगितलें । नामधारक संतोषले । सकळाभीष्ट लाधलें । तात्काळिक अवधारा ॥६५॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । श्रीगुरुचरित्र अतिमनोहर । ऐकतां पावती पैल पार । संसारसागरा तरोनिया ॥६६॥
श्रीगुरुचरित्र ऐकतां । सकळाभीष्टें तत्त्वतां । लाधती म्हणोनि समस्तां । ऐका म्हणे नामधारक ॥६७॥
अमृताची असे माथणी । स्वीकारितां भाविक जनीं । धर्मार्थ काम मोक्ष साधनीं । हेचि कथा ऐकावी ॥६८॥
पुत्रपौत्रां ज्यासी चाड । त्यासी हे कथा असे गोड । राहे लक्ष्मी स्थिर अखंड । श्रवणमात्रें घरीं नांदे ॥६९॥
चतुर्विध पुरुषार्थ । लाधती श्रवणे परमार्थ । श्रीनृसिंहसरस्वती गुरुनाथ । रक्षी त्यांचे वंशोवंशीं ॥७०॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । श्रोतयांसी करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्टें साधती ॥७१॥
मुख्य भाव कारण । प्रेमें करितां श्रवण पठण । निजध्यास आणि मनन । प्रेमें करोनि साधिजे ॥७२॥
श्रीनृसिंहसरस्वती शंकर । त्याचे चरणीं अर्पण साग्र । त्याचेचि प्रसादें समग्र । समस्त प्रजा सुखी असती ॥७३॥
ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानीं । शुद्ध वस्त्रीं शुद्ध मनीं । नित्य पूजा करोनि । ग्रंथ गृहामाजीं ठेवावा ॥७४॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्धनामधारकसंवाद अमृत । गुरुसमाधि नाम विख्यात । एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥७५॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुसमाधिगमनं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥५१॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
ओवीसंख्या ७५